भूदान करा , धनदान करा
(चाल: अज काहेको धूम मचाते हो !...)
भूदान करा, धनदान करा ,
ही पुकार घ्या श्रमिकांची, बहु वेळ नसे कामाची ।।धू0।।
आज सांगती विनंति करुनी, त्यागी-संत-पुढारी ।
कोण सांगतो वेळ? उद्याच्या जनतेची ललकारी ।।१।।
सर्व मिळोनी बंधु म्हणोनी, नांदु अपुल्या देशी ।
करा करा तातडी मित्रहो, वेळ न द्या परक्यांसी ।।२।।
उपवासी पोटाचा अग्नी, पाप - पुण्य समजेना ।
शांतिने क्रांती न झाली तर आवरि कोण धिंगाणा ।।३।।
श्रमीक चिडतिल मधेच अडतिल,पडेल भूमि रिकामी।
मार्ग मिळे जो करतिल जन ते, होऊनिया अनिवारी ।।४।।
रक्त वाहवूनि नको क्रांति ती, म्हणुनि याचना सगळी ।
भू-दानाला यश ना ये तर, येईल तेचि कपाळी ।।५।।
समाज हा समतोल असावा, मानव जगण्यासाठी ।
तुकड्यादास म्हणे-सुजनांनो, ऐकुनि बांधा गाठी ।।६।।
- पंढरपुर, दि.२४-0७-१९५३