आता तरी येऊ द्या अक्कल -- पोवाडा
आता तरी येऊ द्या अक्लक, होतील बेहाल,
पुसेना कुणि मग जातीला ।
धनाला आणि घराण्याला ।
जमाना सत्याचा आला रे, जी0।।धृ0।।
जरि असाल मनाने मोठे, कराल काम खोटे,
ओढतिल लोक गल्लिवरती ।
हातापायासि घट्ट धरती ।
टाकतिल नाकि-तोंडी माती रे, जी0।।१।।
ही सोडा दारूची चट, आणि कपट,
हासती लोक तुच्छ म्हणूनी ।
कोणितरि म्हणतील घ्या पुजुनी ।
तमाशा बघति आई-बहिणी रे, जी0।।२।।
करा गावलोकांची सेवा, स्मरुनिया देवा,
लोकप्रिय व्हा चटकन आता ।
नम्र करूनिया उंच माथा ।
सोडुनि कायमची अहंता रे, जी0।।३।।
द्या जातपात सोडूनी, म्हणा गर्जुनी,
झालो आम्ही मानवजातीचे ।
देशसेवेच्या पंक्तीचे ।
शिपाई लोक - रक्षणाचे रे, जी 0।।४।।
चारित्र्य अंगी बाणवा, नीतिचा दिवा,
उजळूनी प्रेमदृष्टि सम ती ।
बघु नका कोणाला कमती ।
नागरिक व्हा उत्तम रीती रे, जी0।।७।।
मोठमोठ्या आले अवगुण, म्हणूनिया मान-
उतरला अमुच्या देशाचा ।
पगडा बैसला परकियाचा ।
गांधीनी पांग फेडला अमुचा रे, जी0।।६।।
आली स्वतंत्रता देशाला-मुकुट चढविला,
तिरंगा राष्ट्रध्वज बनला ।
शोभवी दिव्य चक्र त्याला ।
मानवधर्माचा विजय झाला रे,जी0।।७।।
आता सर्व होऊनि शहाणे, सोडुनी उणे,
द्वेष अन् दोष आपसाचे ।
पक्ष, गट आणिक जातीचे ।
राज्य चालवा सु - नितिचे रे, जी0।।८।।
संदेश गांधीचा स्मरा, राज्य हे करा,
कदर करणार गरीबांचे ।
शेतकरी-मजर-दर्बलांचे ।
राबतिल कष्ट करूनि त्यांचे रे,जी0।।९।।
नक्का राग मानु अंतरी, गोष्ट होणारी,
बोललो सावध व्हा म्हणूनी ।
वेळ थोडा आहे म्हणूनी
तुकड्याचे शब्द धरा कानी रे, जी0।।१0।।