कसं चळलं दारुनं मन -- पोवाडा

कसं चळल दारुनं मन, हरपल भान,
पर्वा नाहि उरली  देहाची ।
लाज खोविली प्रतिष्ठेची ।
जगी नाहि किंमत कवडीची ।
कुत्र्यापरि गति झाली त्यांची रे, जी जी ! ।।धृ0।।
वडिलांचे होत जे धन, बसला गमावुन,
हाति नाही पैसा खर्चायला ।
तोडती   मुलबाळ   त्याला ।
कर्ज करूनिया घरी बसला ।
भिकारी दारोदारी झाला रे, जी जी ! ।।१।।
कुलवान पिढीचा खरा, जाहला चुरा,
दारूच्या नादिच   लागून ।
लोक लाविती दार दुरून ।
बला येईल  कोण    जाण ।
हाक देईना कुणी म्हणून रे, जी जी ! ।।३।।
काय बोलतो साजरा गडी, बात बडी बडी,
गोष्टीला अर्थ नसे काही ।
तार तोडतो    मना    येई ।
समजेना कोणालाच काही ।
लहान-मोठ्यांची लाज नाही रे,जी जी ! ।।४।।
मारतो सदा बायकोला, लेकराबाळाला,
बदबदा कांडी नोकरासी ।
कामाची करून सत्यानाशी ।
मांस खाण्याचा मोठा  हौसी ।
ओळखिना दास आणि दासी रे,जी जी ! ।।५।।
असशील भानावर जरा, ऐक हा पुरा,
पोवाडा केला तुझ्यासाठी ।
सुधर रे सुधर देशासाठी ।
मुलांसाठी नि  धर्मासाठी ।
नाही तर प्राण आला कठी रे, जी जी ! ।।६।।
तुकड्याची ऐक बातमी, कितीतरी कमी ।
झाले या दारूच्यापायी ।
तू  तरी सोड दारू भाई ।
विनंती ऐक माझी कांही ।
नाहीतरि गती बरी नाही रे, जी जी ! ।।७।।