कोण आयकिल रडणे आमुचे
कोण आइकील रडणे आमुचे ?
हे तो दुजियाचे हाती नाहीं ||धृ ||
देवा ! तूचि करी कृपा दीनावरी ।
तुझी ऐसी थोरी ऐकियेली ||1||
चोहोकडे दिसे दाटला अंधार ।
तुझ्याविण पार नोहे माझा ||2||
तुकडादास म्हणे साक्षि तू सर्वांचा ।
भाव जाण साचा ब्रीदासाठी ||3||