नेपानगर येथे २६/०९/१९६५ ला शारदा उत्सवाच्या निमित्ताने झालेले भाषण.
(नेपानगर येथील कामगार आणि अधिकारी वर्गातर्फे दुर्गा उत्सव साजरा केला जातो. सागा-पळसाच्या या डोंगरवनात शारदेचे आगमन काही वेगळ्या प्रेरणा
देऊन जाते. तशात तत्कालिक युद्धस्थितीमुळे ते आणीबाणीचे दिवस! अशा काळात उत्साह असणार तो पौरुषाचा, पराक्रमाचा. नेपानगर त्याला अपवाद
नव्हते. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजन भाषणाला झाडून सारे नेपानगर हजर असावे असे वाटत होते. त्या प्रचंड जनसागराच्या उत्साह-
लहरींशी हसत खेळत दिनांक २६/0९/१९६५ च्या रात्री राष्ट्रसंतांनी केलेले भाषण येथे घेतले आहे- संपादक)
मित्रहो! पुष्कळ वर्षानंतर का होईना पण तुमची भेट झाली याचा मला आनंद होतो. युद्धाच्या परिस्थितीमुळे आता येथले वातावरण संपूर्ण बदलून गेले आहे. देशातला लहानसा पोरसुद्धा आता जागा झाला आहे. सर्वत्र जागृती पसरली आहे. त्याला तुमचे नेपानगर कसे
अपवाद राहील? कारण तुमची वस्ती ही शिक्षित कामगारांची वस्ती आहे. तुमच्या हातात देशाच्या विकासाची एक योजना साकार होत आहे. तुमची जागृती डोळ्यात भरणारी नसती तरच नवल होते!
आज आपण शारदोत्सवाच्या निमित्ताने माझ्यापुढे बसला आहात. आपला शारदोत्सव सुद्धा या जागृतीचाच एक प्रकार होय. शारदा ही अन्यायाच्या प्रतिकाराची प्रतिकात्मक देवता आहे. तिची
आराधना आपल्याला विजयाकडेच घेऊन जाईल.
अर्जुनाचा भ्रमनिरास:-
या देशात जेव्हा जेव्हा युद्ध झाले तेव्हा तेव्हा ते अन्यायाच्या प्रतिकारासाठीच झाले आहे. आक्रमणाच्या प्रतिकारासाठी येथे गीताशास्त्राचा जन्म झाला आहे. केव्हाही आक्रमणाचा प्रतिकार यथे प्रेरणापूर्वक केला जातो. याचे कारण आमच्यामागे हे धर्माचे, नीतीचे
आणि शास्त्राचे अधिष्ठान आहे. येथे पाच हजार वर्षापूर्वी महाभारत घडले, ते सुद्धा अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठीच. कौरवांनी पांडवाना जेरीस आणले होते. पांडव पाच गावावरसुद्धा संतुष्ट रहावयास तयार
होते.परंतु कौरव त्यांना सुईच्या टोकावर बसेल एवढीसुद्धा जमीन देण्यास तयार नव्हते. श्रीकृष्णाची शिष्टाई वाया गेली होती. अशा परिस्थितीत युद्ध करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तशी तयारीही झाली
होती. पण ऐनवेळी अर्जुन भ्रमात पडून त्याला संन्यास घेण्याची भावना झाली. आपल्याच सग्या-सोयऱ्यांना केवळ राज्याच्या मोहासाठी मारावे हे अर्जुनाला योग्य वाटत नव्हते. अशा मोहाने ग्रासलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगून भानावर आणले.
अन्यायाचा प्रतिकार करणे हे कोणत्याही देवपूजेपेक्षा श्रेष्ठ आहे हे श्रीकृष्णाने अर्जुनाला पटवून दिले आणि मग भारतीय युद्धाची कथा घडली. आजही जवळ जवळ तोच प्रसंगं आपल्यापुढे उभा आहे.
म्हणून यावेळी आपली भूमिका खंबीर असली पाहिजे.
आज आपल्या देशाने प्रजातंत्ररूप धारण केले आहे. येथला प्रत्येक नागरिक स्वत:ला भारतीय मानतो. आपले पहिले कर्तव्य हेच आहे. भारतीय स्वातंत्र्याला थोडासुद्धा आघात पोचू शकणार नाही ही आपली धारणा असावी. जो कोणी या देशाशी बेइमानी करील
त्याची येथे केव्हाही गय केली जाणार नाही. अशा लोकांच्या विरोधात सर्व शक्तिनिशी आपण उभे राहिले पाहिजे.
येथे भावाभावातसुद्धा युद्ध छेडले गेले आहे. श्रीकृष्णासारख्या अवतारी पुरुषाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले आहे. ही येथली
महान अशी नीती आहे. शिवाजी महाराजांनीसुद्धा आयुष्यभर गनिमांविरूद्ध तरवार उपसली. पण त्यांची ती लढाई कोणाही धर्माविरुद्ध नव्हती. उलट शिवाजीच्या सैन्यात महत्त्वाच्या जागा
मुसलमानांच्या हातात होत्या. याचा अर्थ एवढाच की शिवाजी महाराजांनी केलेली लढाई ही मुसलमानांविरुद्ध व त्यांच्या धर्माविरुध्द नव्हती, तर एका अन्याय्य शक्तीशी होती. श्रीरामचंद्रांनीसुद्धा रावणाशी याच भूमिकेतून युद्ध केले. आणि त्याच्याच कुळातील बिभीषणाला
गादीवर बसविले.
आधी देश मग धर्म :
मित्रहो, आज सुद्धा आपण तशाच परिस्थितीत आहोत.
अन्नाच्या बाबतीतले आपले परावलंबन दूर झाले पाहिजे. इथला प्रत्येक माणूस सैनिक बनला पाहिजे. पानतंबाखूचे, बिडी सिगारेटचे कारखाने बंद पडले तरी चालतील परंतु महत्त्वाच्या उत्पादनाचे कारखाने
आठ तासाऐवजी दहा तासांच्या पाळ्या लावून चालविले पाहिजेत. उत्पादन वाढवून देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. शस्त्रास्त्े आणि जीवनाश्यक वस्तू फार मोठ्या प्रमाणात येथे निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने काम करीत राहिले पाहिजे. अशा प्रकारे भारताला भक्कम करण्यातच देवाची आणि धर्माची सेवा आहे. देश
आधी मग धर्म, देश जगला तर धर्म जगतो. आणि धर्म जगला तर देवता जगत असतात. ही प्रेरणा आपल्याला मिळत रहावी यासाठी आपण उत्सव साजरे करीत असतो. या उत्सवमूर्तीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी आपल्यात प्राण फुंकले आहेत. त्यांच्यामुळे आपल्या संस्कृतीचा विकास झाला आहे.
माणूस हा सृष्टीतला सर्वात श्रेष्ठ म्हणून देवाने निर्माण केला आहे. त्याने समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी जगावे ही त्याच्यामागे देवाची इच्छा आहे. तो तसे जीवन जगत नसेल, केवळ स्वत:चाच स्वार्थ पहात असेल तर तो किडा-मुंगीचे जीवन जगत आहे असे
मानले पाहिजे. जेव्हा तो देशाचे, धर्माचे, समाजाचे भान ठेवून जगेल तेव्हाच तो महान होईल. मी देवतांना केवळ पूजेची स्थाने मानत नाही. त्यांच्यापासून माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य मिळाले
म्हणून त्यांचे मला महत्त्व आहे. शिवाजी महाराजांना तरवार
[10/10, 5:45 PM] Suraj Apturkar: भवानीदेवीकडून मिळाली होती हा इतिहास आपल्यासमोर आहेच.
आराधना कशासाठी ? :-
आराधना सारेच करीत असतात. पण प्रत्येकाची आराधना आपआपल्या हेतूसिद्धीसाठी असते. चोर आराधना करतो आपली चोरी कोणाच्या नजरेस पड़ू नये म्हणून. नेता आराधना करतो आपण
निवडणुकीत निवडून यावे म्हणून. परंतु शूरवीर आराधना करीत असतो देशाच्या, धर्माच्या रक्षणासाठी-गोब्राह्मणाच्या प्रतिपालनासाठी.
आज आपला भारत अनेक धर्मात विभागला गेला आहे. आपले त्या सर्वांशी बंधूभावाचे नाते आहे. आपले युद्ध आहे ते देशद्रोह्यांशी, असुरी वृत्तीशी. आपण वर्षातून एकदा दुर्गा उत्सव करतो, याचा अर्थ आपल्याला वारंवार वीरतेची प्रेरणा मिळत रहावी हा
आहे.
सेवेचा धंदा झाला :-
आपला नेहमीचा धंदा इमानदारीने करीत राहणे ही सुद्धा अन्यायाविरुद्ध लढाईच आहे. आज प्रत्येक क्षेत्रातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. माणूस आपला खरा धर्म सोडून दांभिक बनू लागला आहे. तो रोज देवळात जातो. सोवळे नेसतो. नाकापासून
शेंडीपर्यंत गंध फासतो. परंतु सकाळी दुधात पाणी टाकून बाजारात विकतो. तो सरकारी अधिकारी असेल तर लाच घेतल्याशिवाय लोकांची कामे करीत नाही. तो व्यापारी असेल तर मालात भेसळ केल्याशिवाय रहात नाही. अशा माणसांना देव कधीही सापडणार
नाही. इतकेच नव्हे तर ते देशाचे आणि धर्माचेही भले करू शकणार नाहीत. देश ताठ उभा रहात असतो माणसाच्या प्रामाणिकपणावर, वीरतेवर.म्हणून आपण प्रामाणिकपणाची, वीरतेची आराधना केली पाहिजे. सैनिक रणांगणावर प्रामाणिकपणाने लढतील. शेतकरी
प्रामाणिकपणाने शेतातून पीक काढतील. कामगार कारखाने
चालवितील. साधू. पंडित लोकांत जागृती निमाण करतील. सर्वांच्या प्रयत्नांची देशाला गरज आहे. ही वृत्ती म्हणजेच देशभक्ती. देवभक्ती आणि देशभक्ती या दोहोत फरक आहे असे निदान मला तरी वाटतनाही.
चातुर्वण्ण्याचे विकृत रूप:-
पूर्वीची समाज व्यवस्था ही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
कर्मावरून जाती ठरत. आजच्यासारखा जातिभेद तेव्हा नव्हता. सर्वानी समाजोपयोगी कामे करायची आणि गुण्यागोविंदाने रहावयाचे अशी पद्धत होती. ब्राह्मण विद्यासाधना आणि ईश्वर-चिंतनाचा विचार
करीत. क्षत्रिय सर्वांचे संरक्षण करीत. वैश्य व्यापार आणि शूद्र इतर सेवाकार्ये करीत. पण
पुढे या व्यवस्थेचा विपर्यास झाला. ब्राह्मणाचा
मुलगा हॉटेलात भजे तळतो आणि स्वत:ला ब्राह्मण म्हणवतो. क्षत्रियाचा मुलगा तमाशात जातो आणि स्व:ला क्षत्रिय म्हणवतो. हा विपर्यास सध्या विकोपाला पोचला आहे. आता येथे जन्मावरून जात ठरते
आणि समाजाची महत्त्वाची सेवाकार्ये करणारे लोक अप्रतिष्ठेचे जीवन जगतात. ही स्थिती बदलली पाहिजे. पुजारी आणि भंगी या दोघांचीही सेवाकार्ये एकाच दर्जाची आहेत. सावता माळी हा शेतीच्याद्वारा
देवाची पूजा करीत होता. गोरा कुंभार मडकी घडवून विठ्ठलाला प्रसन्न करीत होता. याचा अर्थ आपले काम इमानदारीने करणे हीच खरी देवपूजा होय.
उत्सवांची शक्ती:-
गणेशोत्सव हा सुद्धा एक राष्ट्रीय उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी त्या उत्सवाला जिवंत स्वरूप आणले. आणि राष्ट्रजागृती केली. आपण आज दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने तेच कार्य करीत आहात. म्हणून मी म्हणतो की, आपली जागृती हे एक राष्ट्रकार्य
आहे आणि पुण्यकार्यही आहे.