मध्यप्रदेश मधील सिवनी- मालवा येथील २९/०९/१९६५ मध्ये झालेले भाषण

मध्यप्रदेशातील इटारसीजवळचे सिवनी-मालवा हे गाव लहानसे खरे, पण भावभक्तीच्या दृष्टीने अग्रेसर असे आहे. तेथे स्टेजवर आभार मानायला कोणी
सापडणार नाही, पण घराघरात पूजा करायला आणि गावात आलेल्या अतिथी अभ्यागतांचे स्वागत करायला कोणाला शिकवावे लागत नाही. प्रचंड उत्साह.
प्रचंड सज्जनता आणि प्रचंड धार्मिक भावना! येथे दिनांक २९/०९/१९६५ रोजी दिले गेलेले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे भाषण येथे घेतले आहे- संपादक)

मित्रहो ! हे दिवस आनंदाचे नाहीत. विषण्णतेचे आहेत,
चिंतेचे आहेत. आपला सारा देशच आज चिंतेच्या वातावरणातून आगेकूच करीत आहे. देशाच्या चारही बाजूंनी शत्रू आक्रमण करण्यास टपून बसला आहे. अन्नधान्य आणि अन्य चिंता आज आपल्यामागे
हात धुवून लागल्या आहेत. अशावेळी आम्हाला जे जे करावे लागेल ते सर्व देशाच्या विकासाला, स्वातंत्र्याला आणि संरक्षणाला पोषक होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे.
उत्सवांचा मूळ हेतु:-
दरवर्षी दुर्गा उत्सव येतो. या उत्सवाचा मूळ हेतु वीरांना
शक्ती देणे हा आहे. आपण फक्त रणांगणात लढतील तेवढ्यांना वीर म्हणतो. पण वीर या शब्दाचा अर्थ जरा अधिक व्यापक करून घेतला पाहिजे. जीवनातले प्रत्येक क्षेत्र हे रणांगण आहे. या क्षेत्रात
विजय मिळविण्यासाठी जे धडपडतात ते वीर आहेत. आणि जे या विजयाच्या आड येतात ते आपले शत्रू आहेत. शत्रू बाहेर असतात आणि मनातसुद्धा असतात. कुणा कवीने म्हटले आहे.
अफाट अशा विश्वरणांगणी
जीवित युद्धचि चालतसे
 याचा अर्थ स्पष्टपणे एवढाच की, शेतात राबणारा आणि
अन्न उत्पादन करणारा शेतकरीसुद्धा एक वीरच आहे. त्याचप्रमाणे कारखान्यात कष्ट उपसणारा कामगार हाही वीरच आहे. अशा वीरांना शक्ती देण्यासाठी दुर्गामातेची योजना आहे.
आध्यात्मिक देश:-
आपला हा देश सुरुवातीपासून आध्यात्मिक प्रवृत्तीचा देश आहे. येथे बाहेरचे दोष पाहण्यापेक्षा आतले दोष पाहिले जातात. येथे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा विचार स्वत:पासून केला जातो. ही
येथली एक विशेष परंपरा आहे. इतर ठिकाणी असे दिसत नाही. इतर देश हे भौतिक शक्तीचे उपासक आहेत. ते अणूबॉम्ब बनवतील, पल्लेदार दुर्बिणी बनवतील. परंतु स्वत:जवळ काय जळते, हे त्यांना
पाहता येणार नाही. आपण ते पाहूं शकतो. याचे कारण आपली प्रेरणा ही आध्यात्मिक प्रेरणा आहे. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात देवतांचे, धर्माचे आपण महत्त्व मानले आहे.

या देशात पन्नास कोटी लोक राहतात. इतकी प्रचंड लोकसंख्या जगाच्या पाठीवर चीन सोडून दुसऱ्या कोणत्याही देशाजवळ नाही. परंतु आमची ही जनसंख्या कोणावर आक्रमण करण्यासाठी नाही. आम्ही आतापर्यंत कोणावरही आक्रमण करण्याचा विचार केलेला नाही. आमच्या
इतिहासात असा एकही दाखला कोणाला दाखविता येणार नाही. परंतु आमच्या या धोरणाचे विपर्यास केले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. आमच्या या धोरणामुळे आम्ही लोकांना दुबळे वाटतो, असमर्थ वाटतो. आमचा लचका तोडणे सोपे आहे अशी त्यांची धारणा होते. परंतु लवकरच त्यांचा हा गैरसमज निघून जातो. आम्ही शौर्यातसुद्धा कमी नाही अशी पहिल्याच सलामीत त्यांची खात्री होते. याचा अर्थ असा
की आम्ही ज्याप्रमाणे कोणावर आक्रमण करीत नाही त्याचप्रमाणे कोणाचे आक्रमणही आम्ही सहन करीत नाही.
 हिंसा-अहिंसा-:
भोवतालची सारी राष्ट्रे आज शस्त्रबळावर उभी आहेत.
लष्करी सामर्थ्य हा त्यांचा मूळ आधार आहे. अशा परिस्थितीत आम्ही केवळ अहिंसेचा जप करीत बसू तर पराभूत ठरू. आमचेही शस्त्रसामर्थ्यं आम्हाला वाढवावे लागेल. लोक हायड़ोजन बॉम्ब बनवतील तर त्याचा सामना करण्यासाठी आम्हालाही तो बॉम्ब संग्रही ठेवावा लागेल. आक्रमणाचा प्रतिकार हिंसात्मक मांर्गांनी केला तरी सुद्धा ती हिंसा होऊ शकत नाही. हिंसेचा संबंध वृत्तीशी आहे. डॉक्टर ऑपरेशन करतो आणि शरीराचा वाईट भाग कापून काढतो. परंतु कोणी डॉक्टरला हिंसक म्हणत नाही. त्याचप्रमाणे
स्थिर बुद्धीने केलेल्या आक्रमणाच्या प्रतिकारालासुद्धा हिंसा म्हणता उपयोगी नाही. आम्ही शस्त्रास्त्रे बनवू आणि त्याचप्रमाणे आमच्या सैनिकांना शस्त्रे कोणत्या बुद्धीने चालवायची याची अक्कलही देऊ.
आमचा प्रत्येक जवान हा अर्जुनासारखा शस्त्रविद्या पारंगत आणि विवेकशील वीर असेल. आणि देशाचे धर्माचे, नीतीचे रक्षण करणे ही त्याची जबाबदारी असेल.
पुष्कळ लोक अहिंसेचा आदर्श डोळ्यापढे ठेवतात. मी
तसा आदर्शवादी नाही. व्यवहारवाद मला अधिक जवळचा वाटतो. तो धर्माने व्हावा, नीतीने व्हावा, शिस्तीने व्हावा असे मला वाटते. जोपर्यंत माणसाच्या मनात प्रेमाबरोबर द्वेष आहे तोपर्यंत युद्ध अपरिहार्य
आहे असा माझा समज आहे. म्हणून शस्त्रास्त्रांची उपेक्षा करून आपले चालणार नाही. उलट उत्कृष्ट प्रतीची शस्त्रे आणि अस्त्रे आपल्याला बनवावी लागतील. हो ! भारताला अणुबॉम्ब सुद्धा बनवावा लागेल. अखेर शुरांची शुरता ही उत्तम शस्त्रास्त्रांवर अवलंबून असते. शत्रंनी तोफा आणि रणगाडे घेऊन आमच्यावर आक्रमण करावे आणि आम्ही हातात खलबत्ते घेऊन त्यांचा प्रतिकार करावा असे
 कोणी म्हणेल, तर ते हास्यास्पद आणि अतिरेकीपणाचे होईल. आक्रमणात क्रूरता असते, परंतु प्रतिकारात शूरता असते.
धर्मयुद्धाचा अर्थ:-
भारत जेव्हा जेव्हा युद्धात उभा राहिला तेव्हा तेव्हा तो
आततायीपणाने उभा राहिला नाही. प्रत्येक वेळी तो अन्यायाच्या विरुद्ध उभा राहिला आहे. भारत आज पाकिस्तानच्या विरोधात उभा आहे. याचा अर्थ तो मुसलमान धर्माच्या विरोधात उभा नाही.
पाकिस्तानी जनतेच्या विरोधात उभा नाही. तर पाकिस्तानी हुकुमशहांनी जे आक्रमक धोरण अंगिकारलेले आहे त्याचा बीमोड करण्यासाठी
उभा आहे. आजचे युद्ध हे धर्म आणि अधर्म, न्याय आणि अन्याय, चांगले आणि वाईट अशा स्वरूपाचे युद्ध आहे. जगातल्या सर्व वाईट शक्ती आज पाकिस्तानच्या बाजूने सहमत आहेत. आणि याच्या उलट जगातल्या सर्व सज्जन शक्ती तटस्थ आहेत. या वृत्तीशी सामना करणे याला आम्ही धर्मयुद्ध म्हणतो. धर्मयुद्ध म्हणजे धर्माचे धर्माशी युद्ध नसून धर्माचे अधर्माशी युद्ध हा आहे.
हा उपदेश पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. तेवढ्यासाठी त्याने त्याला गीता सांगितली आणि स्वार्थाने घेरलेल्या स्वजनांविरुद्ध लढण्यास सिद्ध केले. अर्जुन म्हणत होता, स्वजनांना मारण्यापेक्षा मी संन्यास घेईन. मला राज्य नको. यांना मारून राज्य काय कामाचे? त्यावर श्रीकृष्ण म्हणत होता, तू ज्यांना स्वजन म्हणतोस ते तुझे नाहीत. आसुरी वृत्तीने घेरलेले ते जीव आहेत. आपल्या कर्तव्याने या आधीच ते मेलेले आहेत. तु केवळ निमित्तमात्र आहेस. तेव्हा हातात गांडीव घेऊन सज्ज होऊन रणांगणावर पराक्रम दाखव.
यावर ब्रह्मज्ञानाची ओळख झालेला अर्जुन म्हणाला-हे
कसे शक्य आहे? हा संहार मी राज्याच्या लोभाने करीत आहे, असा अर्थ नाही का होणार?
मग श्रीकृष्णाने त्याला शेवटची युक्ती सांगितली. ती अशी की, तू सर्व व्यवहार मला शरण येऊन कर. आणि मग महाभारत घडले !
हातांची जबाबदारी:-
आपणही सारे या अर्जुनाच्या परंपरेतले, देशातले आहोत. आपल्यालासुद्धा आक्रमक व्हायचे नाही. कोणावर आक्रमण करायचे नाही. परंतु प्रतिकारासाठी, स्वरक्षणासाठी जे करावे लागेल ते करण्यास
सिद्ध राहिले पाहिजे. एका शिपायाच्या लढणाऱ्या दोन हातामागे मदतीचे वीस हात लागत असतात. हे हात यंत्रात, शेतात, मिलात खपून देशाला आणि जवानांना शक्ती पुरवीत असतात. म्हणून आपली जबाबदारी आपण इमानदारीने पार पाडली पाहिजे, हाच आपला धर्म आहे. दुसरा धर्म होऊ शकत नाही. मग तुम्ही हिंदू असा, मुसलमान असा नाही तर आणखी कोणी असा ! तुम्ही सारे भारतीय आहात. आणि भारताच्या सुरक्षिततेसाठी, स्वातंत्र्ासाठी बद्धपरिकर आहात.
आपले काम इमानाने करणे हीच धर्माची व्याख्या आहे.
जर आम्हाला या देशाचे संरक्षण आणि स्वातंत्र्य अपेक्षित असेल, देश धनधान्याने समृद्ध व्हावा असे वाटत असेल, तर आपण सर्वांनी आघाडीवरच्या सैनिकांप्रमाणे आपल्या समोरच्या प्रत्येक क्षेत्रात
हिरीरीने तुटून पडले पाहिजे.
 आता आपले राज्य हे एक प्रजाराज्य आहे. गणराज्य आहे. येथे आता कोणी राजा नाही. आम्ही पन्नास कोटी लोक ज्याला निवडून देऊ तो आमचा राजा होतो. जो आम्हाला नको असतो त्याला आम्ही अधिकारावरून खाली ओढू शकतो. अशी व्यवस्था जगात फारच थोड्या राष्ट्राजवळ आहे. तेव्हा असे राष्ट्र आणि त्याची
व्यवस्था टिकविणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
भोवलेली चूक:-
पूर्वाची चातुर्वर्ण्य व्यवस्था या नव्या संदर्भात आपल्याला पुन्हा लागू करून घेतली पाहिजे. पूर्वी जाती कामावरून ठरत. आता त्या जन्मावरून ठरतात. त्यामुळे त्या काळात तमाशात नाचणारा क्षत्रियाचा पोर क्षत्रिय होत नसे. त्याला भडवा म्हणत. तीच व्यवस्था
थोड्याफार फरकाने आज लागू झाली पाहिजे. जो रणात लढेल तो क्षत्रिय, जो पूजा करील तो ब्राम्हण. मग तो जातीने भंगी असला तरी चालेल. अखेर माणसाची जात ही जन्मावर अवलंबून नाही. ती त्याच्या
कर्तव्यावर अवलंबून आहे. क्षत्रियाच्या कुळात पैदा होऊनही जर एखादा तरूण घरात कोंबड्या पाळत असेल, तर तो क्षत्रिय नाही. ही व्याख्या
आपण आज वेदमंत्रासारखी मनात कोरून ठेवली पाहिजे.
भारतीयता हा आपला पहिला धर्म आहे. भारतावर जर
कोणते संकट आले तर आम्ही सर्व मिळून त्याचा प्रतीकार करू हा आपला पहिला धर्म आहे. निधर्मी राज्य याचा अर्थ धर्महीन राज्य असा होत नाही. धर्मातीत राज्य असा त्याचा अर्थ आहे. येथे सर्व
धर्मांना सारखी प्रतिष्ठा आहे. धर्म म्हणजे समाजाला सुसंघटित ठेवणारी विचारधारा. ज्या विचारांमुळे समाजाची धारणा होते त्या विचारांना धर्म असे नाव आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने आपण आपल्या
धर्मापासून दूर गेलो आहोत. तसे झाले नसते, तर या देशावर आक्रमण करण्याची कोणाची छाती झाली नसती. शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर हजर नसतो तेव्हाच त्याचे शेत गुरे खातात. तसेच हे आहे.

संकटातून सावधपणा :
आपल्यावर झालेले कालचे चीनचे आणि आजचे
पाकिस्तानचे ही दोन्ही आक्रमणे आपण वरदानरूप मानली पाहिजेत. तसे झाले नसते तर आपण अत्यत असघटित आणि गैरसावध राहिलो असतो. या आक्रमणांचा उपयोग आपण आपल्या अंतर्शुद्धीसाठी करून घेत आहोत, यातच आपला जय आहे. आता आपला जवान असावध राहणार नाही. आता आपला शेतकरी आळशी बनून कमी पीक काढणार नाही. आता या देशातले कामगार संप करणार नाहीत. सर्व बाजूंनी हा देश सावध आणि धडपडत राहील. आपल्या गरजा तो
आपल्या पुरुषार्थातून, पराक्रमातून, कष्टातून भागवील आणि भारत हे ।
एक सुखी, समृद्ध आणि पराक्रमी राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहील. माझे भारताबद्दलचे स्वप्न असे आहे.