पापी पाहोनिया नका धरू मान
पापी पाहोनिया नका धरू मान ।
मीच पुण्यवान म्हणोनिया ॥धृ॥
देवाची करणी विचित्रचि आहे ।
करील तो काय कळे कोणा ? ॥1॥
अजामीळ पापी मोक्षपदा नेला ।
दशरथा दिला गर्भवास ॥2॥
तुकड्यादास म्हणे लीनचि रहावे ।
प्रभुसी स्मरावे ध्यानींमनीं ॥3॥