देवाचे करणे न दिसे कोणासी ।

देवाचे करणे न दिसे कोणासी । 
काय कधी कैसी हानी करी ? ॥धृ॥
श्रीमंताचा रंक रंकाचाहि राजा । 
करील सहजा सहजी देव ॥1॥
महाली खंडारे खंडारी वावरे । 
वावरांत हीरे भेटवीतो ॥2॥
तुकड्यादास म्हणे सर्वा आहे ठाव । 
भुलला मानव दंभधर्मे ॥3॥