पटातटाला फोडुनी आलीस पूर्वेहूनी कुणीकडे
(चालः हटातटाने पटा रंगवुनि...)
पटातटाला फोडुनि आलिस पूर्वेहूनि कुणिकडे ।
धावसी धैर्यधीर निर्भिडे ! ।।धृ०।।
जलबुंदांची करित गर्जना, फोडुनि गिरिचे कडे ।
ओघ दाविसी सरळ - वाकडे ।।
प्रचंड चक्रे मिरवित मिरवित,खळखळ ध्वनि तव पुढे ।
निघालिस वेष्टित गिरिचे कडे ।।
( अंतरा ) अग आई नर्मदे ! बोल जरा तरि मशी ।
अग ! कुणा बघाया वेग धरुनि वाहसी ?
मधु रुचिर नेत्र करुनिया कुणा पाहसी ?
प्रेमामृत हृदयात उफाळित, भरुनि यशाचे चुडे ।। धावसी 0 ।|१|।
प्रफुल्ल उपवन, भ्रमर सुरंमित, ओढित झर-जीवना ।
शांतवित आर्तानच्या मन्मना।।
क्षेत्र-क्षात्र, मठ-मढी भोवती, वसवित सुंदरपणा ।
पुरविसी योगी - हृदय - कामना ॥
पुष्प-अलंकृत बागबगीचे, किती धातुच्या कणा ।
उघडूनी दाविसी सकला जना ॥
(अंतरा) किति तेज तुझ्या या लाटांच्या वरवरी ।
प्रत्यक्ष चंद्र जणु दिसे हृदय-मंदिरी।
जणु बाळ खेळती नाव जहाजे वरी ।
स्थलास्थलांच्या जन -समुहाचे पाप घेउनी गडे !। धावसी0 ।।२।।
झटपट, लगबग,गडबड तुजला झालि कशाची तरी ?
उभी नच राहि जरा तिळभरी ।
ऋषी-मुनींच्या आश्रमि जाया वेळ न उरते उरी ।
म्हणुनिया बघसि अम्हा कशि तरी ।।
पुण्यश्लोक जन उभे कुठे तरि म्हणुनि जासि झडकरी ।
पश्चिमे आखित पथ बावरी ।।
(अंतरा) तव धन्य आई गे ! स्फूर्ति-स्फुरण चपलता ।
मज गमे तुझी ही बुध्दि सहज सहजता ।
तुज निर्मियले तो तोचि अखिल निर्मिता ।
तुकड्यादासा दे दर्शन, मम नेत्र तुझ्या पदि जडे ।। धावसी 0।।३॥