देइ मना सदगुरु ! पद-सेवा । देइ मना
(चाल: जमुनातट राम खेले...)
देइ मना सदगुरु ! पद-सेवा । देइ मना ।।धृ०।।
नच सांभाळे काळ-उसांडा, नलगे मज सुख-संपद-रांडा
मानिन मी तुज ईश्वर - भावा ॥१॥
वृत्ति सदा नि:संग असू दे, मूळ-रुपांतरि स्वस्थ बसू दे ।
चुकवी मम काळाच्या खेवा ।।२।।
सूखकर साधू-संग असावा,शाल-दुशाला काही नसावा ।
ऐक्य वसो निज दैव सुदैवा ॥३॥
जोवरि वास इथेच घडावा,निकटपणा तो मानसि द्यावा
तुकड्यादास म्हणे गुरुदेवा ! ॥४।।