नको भिऊ तू मना !

(चाल: धन्य-धन्य गे ! स्फूर्ति तन्मये...)
नको भिऊ तू मना ! कुणाला, राही निर्भय मनी ।
निसंगी विहरी आपुल्या जनी  ॥धृ०।।
त्रैतापाचा त्रिगुण-फंद हा, यातुनि दूर हो भला !
साचवी सत्यत्वाची कला ॥
काम क्रोध, मद, मत्सर यांची सोबत सोडी गड्या !
मारि अलमस्त स्वरुपी उड्या ।।
कामकाजी वेळ गुंतवी, न तरी राही उगा ।
नको फिरू रानिवनी वाउगा ॥
लीनता धरी बघ  संत - जनाचे    पुढे ।
निशिदिनी वाक्य घे विवेकीया रोकडे ।
सोडुनी स्वरुपा जाऊ नको कुणिकडे ।
सांभाळ काया, जाइल वाया, मरशी रे ! भव-रणी ॥ निसंगी0।|१|।
परधन आणि परकांतेसी, शिवू नको बा ! कधी ।
बधिर तू हो परनिंदेमधी ॥
नको देउ विश्वास कुणाला, अविश्वास व्हावया ।
बुडविसी संत-जनाची मया ॥
मायेच्या फंदात पड़निया, खोवशील तन रया ।
जाशि मग गर्भवास पहावया ।।
नच करी कधी बडबडी व्यर्थ वाउगा ।
नच धरी कधी तो परोक्ष वदनी  उगा ।
राहि बा ! निरामय स्वच्छंदी वाउगा ।
नको दाखवू गर्व कुणाला, होशि यमाचा ऋणी॥निसंगी0 ॥२॥
पुण्यकर्म करण्यात कधी कर मागे घेऊ नको ।
करुनिया मग पस्तावू नको ।।
विना अपराध कुणाला काही मारू, त्यागू नको ।
दिले ते वापस मागू नको ॥
जे जे करशिल ते भोगाया, दूर कधी पळू नको ।
नको ते पुन्हा तरी करु नको ॥
जरि कर्म आडवे येइल मार्गामधी ।
तरि भोगि सुखाने, नच घे मागे कधी ।
पण स्मरण करी रे सद्गुरुचरणा अधी ।
तुकड्यादासा दासपणा दे, लीन गड्या ! हो रणी।। निसंगी0 ||३|॥