मन हे स्वस्थ बसो ना देई

(चालः राग- जीवनपुरी...)
मन हे स्वस्थ बसो ना   देई  ॥धृ०।।
मी पाहतो, ते फिरतचि राहे, मर्कटसम दिशि दाही ।।१॥
धाव सदा घे विषय-सुखाची, संशय काढित  राही ॥२।।
योग - वियोग किती जरि केले, समरस वृत्ति न होई ॥३॥
तुकडयादास म्हणे सद्गुरुविण, औषध त्या कुणि नाही ।।४॥