कुणि म्हणतिल का ? आस जिवाला नाही
(चालः मनि धीर धरी शोक आवरी..)
कुणि म्हणतिल का ? आस जिवाला नाही ।
सोडली लाज हरिपायी ॥धृ०॥
पोटास मिळे कळणा-कोंडा खावा, हरी हरी मुखाने गावा ।
अंगास मिळे चिरकुट-चिंध्या काही,घालुनी वेळ काढावी ।
रहायास मिळे पर्णकुटी तणसाची, गुजराण होय देहाची ।
(अंतरा) कुणि येति सगे-शेजारी ।
बसती वृक्षांच्या छपरी ।
गंगेच्या झुळझुळ लहरी ।
करु हरि-गीता बोलणीच दुजि नाही,सोडली लाज हरिपायी ॥१॥
चित्तास सदा निर्मळ; शांत करावे, शमदमी मना वळवावे ।
अधि वागावे, लोका सांगत जावे, हे नियम जिवा शिकवावे ।
अति प्रेमाने गर्जुनि गाणे गावे, मधुसूदनास रिझरवावे ।
(अंतरा) काहि म्हणो यासाठी ।
अम्हि सोडु न प्रभुच्या गाठी ।
जरि. हाति येइ़ नरवाटी ।
मुखि हरि गाया शंका नुरली काही, सोडली लाज हरिपायी ॥२॥
किति गोड गमे संग हरीचा जीवा ? वाटते विसर ना व्हावा ।
निज भक्तीचा बाग उरी लावावा, अश्रुचा फुवारा द्यावा ।
वैराग्याचा कोट-किला बांधावा, षड्विकार-जंतु न यावा ।
(अंतरा) शांतीचा झरा सोडोनी ।
सत् संग रंग मिसळोनी ।
जिव-भाव भेद विसरोनी ।
रंग स्थिरवावी सहज समाधी डोई, सोडली लाज हरिपायी ॥३॥
रंगुनि जावे हरिरंगी निजज्ञाने, मग कोण देह-जग जाणे ? |
नच रीत उरे, कर्म-बंध शरिराने, अजि ! सुटले येणे-जाणे ।
निजरुप दिसे जव पहावे नेत्राने, हा भेद जाणता जाणे ।
(अंतरा)अभ्यास असा दूढ व्हावा ।
मग. जावे हरिच्या गावा ।
सुखसोहळा अनुभवि घ्यावा ।
तुकड्याला मार्ग दुजा कुणी नाही, सोडली लाज हरिपायी ॥४॥