नको आम्हा दुनियेचा मान, प्रभु रे

(चालः तुम्हारे पूजन को भगवान..)
नको आम्हा दुनियेचा मान, प्रभु रे ! तव पायाची आण ॥धृ०l।
जग हे काहि म्हणो आम्हासी, आम्ही सोड न तव पायासी ।
जावो सेवा करिता प्राण, प्रभु रे ! तव पायाची आण ॥१॥
कोणी म्हणोत वेडा झाला, कोणी म्हणोत वाया गेला ।
आम्ही मानु तयाला छान, प्रभु रे ! तव पायाची आण ।।२।।
झाडू संत-पदाची धूळ, तेणे उद्धरु अमुचे कूळ ।
देउ देह गुरुसी दान, प्रभु रे ! तव  पायाची  आण ॥३॥
सेवुनि संतांचा उपदेश, जाळू त्रैतापाचा द्वेष ।
तुकड्या म्हणे करु गुणगान, प्रभु रे ! तव पायाची आण ।।४।।