कृपा कर जानकी-नाथा !

(चालः अगर है ग्यान को पाना..)
कृपा कर जानकी-नाथा ! तुझे मायेत  घाबरलो ।।धृ०।।
सुचेना तू कुठे बसला ? कि भक्ता सारथी झाला ?
करी आता मला धाला, गुणातित नाम तव हरलो ।।१।।
चढे मद, कामना सगळी, न मुरली आतची काळी ।
चरणी लावीन गा ! भाळी, कृपादानीच मी तरलो ।।२।l
उठे वृत्ती नसे भक्ती, जी ! नाही भक्तिची   शक्ती ।
मिळे केवी मला मुक्ती ? विषय-पाशात सापडलो ।।३।।
जगी तुजविण कीव कुणा ? करु कवणाचिया स्मरणा ?
म्हणे तुकड्या करी तरणा,मनी मानी न गुणि भरलो॥४।।