बा मना ! धन्य मग होशी, जव जाशी निज- सदनासी रे !
( कुठवरी भोगिल मोजा )
बा मना ! धन्य मग होशी, जव जाशी निज- सदनासी रे ! ।।ध्रु।।
अमरपूर एक गाव साजिरे, चवधा लोक निवासी ।
जन्म-मरण कधि नसे तयाला, कर्म - धर्म अविनाशी रे ।।१।।
सहा खणांची माडि पाहुणे, सात सात परदेशी ।
सोहं पंखा निशिदिनि चाले, लागे ब्रह्म - पदासी रे ! ।।२।।
सतरावीची धार पाझरे, अमृत दे सर्वासी ।
पिउनी पिउनी मस्त राहती, न ये मृत्यु कोणासी रे ! ।।३ll
ज्ञान- ध्यान- वैराग्य खजाना, राहतो त्यांचेपाशी ।
अनहद-नाद गजर चौफेरी, धुंद सदाहि प्रकाशी रे ! ॥४॥
रवि-शशि-तारे हिरे-चौंकडे, राहति त्या गावासी ।
तुकड्यादास म्हणे मी भुललो, मी-तू नाही त्यासी रे ! ।।५।।