का भुलला भव-संसारी ?

(चालः कुठवरी भोगशिल मौजा..)
का भुलला भव-संसारी ? मग अंतकाळि भय भारी रे ! I।धृ०।।
कोणि न येती साथि, संगाती, पळतिल मग माघारी ।
माडि, हवेली राहिल जागी, धन खातिल  नरनारी   रे ! ।। १।।
कवडी कवडी जोड करुनिया, ठेविसि घर हितकारी ।
जाति पाति मग नेतिल लुटुनी, शेवटि होशि भिकारी रे ! ।।२॥
मायबाप, गणगोत सर्व हे, स्वार्थी रडती भारी ।
सारथि तुला कुणी मग नाही, बनला का  अविचारी  रे ! ॥३॥
लक्ष देइ मम बोला, जग हे सारे   ढोंग - धतूरी ।
मेल्यासम आताचि रहा, मग होशिल पार  अंधारी  रे ! ।।४।।
उघड त्वरे नेत्रास, घालवी   माया   रुप - अंधारी ।
तुकड्यादास म्हणे समजी गुज, सद्गुरुनाम उच्चारी रे ! ।।५॥