पाहिला तो ब्राह्मण निर्धारी

(चालः कुठवरी भोगशिल मौजा..)
पाहिला तो ब्राह्मण निर्धारी, ब्रह्मगिरीच्या शिखरी ॥धृ० ।।
ब्रह्मी राहुनि ब्रह्म पाहतो, शुन्य स्थितिमाझारी ।
अनुभव-वेद, विमल निज वाणी, दाखवि भ्रम - बाजारी ।।१।।
मुलाधारिहुन तिलक चढविला, औटपीठ इकदारी ।
सप्त स्वर्ग उंच चोटि ज्याची, सावरती   नर   नारी ।।२।।
रजोतमोगुण-पात्र ठेवुनी, करि संध्या सरदारी ।
सत्वगुणी घेतसे   आचमन, अद्वय - प्रेम - विहारी ।।३।।
दया-शील, संतोष, कार्य हे, नांदति  त्याचे   द्वारी ।
आशा - मनशा नाहि   जयासी,   विश्वंभर   संसारी ।।४।।
वृत्ति शून्य, संशया आवरी, द्वैत - भावना   वारी ।
तुकड्यादास म्हणे तो ब्राह्मण, न तरि सर्व भिकारी ।।५ ॥