भास हा सोडी सख्या !
(चाल: क्यों नहीं देते हो दर्शन...)
भास हा सोडी सख्या ! मुळ-रुप शोधी आपुले ।।धृ०ll
कोण कुठचे हो तुम्ही ? आला इथे बनुनी श्रमी ।
प्रथम सद्गुरुला नमी, तव घ्या कृपा तेथे भले ।।१।।
बध्द केला जीव तो, नच मैल अजुनी काढतो ।
जन्म-मरणी वाढतो, का यातनी या पातले ? ॥२।।
चित्तशुध्दी वाचुनी, ना होत इतरा साधनी ।
फार ठेले साचुनी मल, साबु घ्या गुरु - पाऊले ।।३॥
धर्म-नीती सेवुनी, भक्ती करा जिव लावूनी ।
सद्गुरु चिंता मनी, तुकड्या म्हणे ऐका भले ।।४।।