कसा धरिला मनी राग, हरी रे !

(चाल: अगर है ग्यानको पाना..)
कसा धरिला मनी राग, हरी रे ! दास-सेवेचा ! ॥धृ०॥
नसे दृढ भाव तनुमाजी, तरी वरवरचि वदलो जी !
करी करुणा सख्या ! आजी, दीनाला तूचि या साचा ॥१॥
मनामाजी असे येते, कुणि न तुजवीण की  माते ।
करी भव-पार निज-हाते, तोड़नी     पाश   काळाचा ।।२॥
बहू दुःखी भवामाजी, लोभ - मद - काम ते गांजी ।
इथे का गा सख्या ! राजी ? हर्ष तुज  दास - दासांचा ॥३॥
कृपा करुनी अता दाता ! धरी दृढ दास हा हाता ।
नको ठेवू दीना फिरता, म्हणे तुकड्या   शिरी  नाचा ॥४॥