धाव त्वरे, श्री शंकर हर बा
(चाल :लागो प्रभू !तव छंद .. )
धाव त्वरे, श्री शंकर हर बा ! धाव त्वरे ॥धृ।।
कटि चर्मासन, नागहि डोले ।
रूप तुझे पाहुनि मन धाले ।
त्रीनयना ! ये, पदरि घरे। धाव त्वरे ।।१।।
शक्ति पार्वती वसे अर्धांगी ।
घालुनि मुंडमाळ अडभंगी ।
त्रिशुल, डमरु; विष कंठि धरे धाव त्वरे ।l२।।
भस्मलेप लावी सर्वांगा l
मस्तकि चंद्र, जटेवरि गंगा ।
सदा स्मशानी वास करे । धाव त्वरे ।।३I।
स्थान जयाचे कैलास शिखरी ।
कीर्ति ज्याची नेणे सहा-चारी ।
तुकड्या म्हणे, पद-सेवा दे रे !। धाव त्वरे।।४l।