निरंजन दत्त निर्विकारी
(चालः कर में चक्र उठाते हैं भारत में....)
निरंजन दत्त निर्विकारी । काय वर्णु मी त्याची थोरी ? ॥धृI|
सहा हात ते अणि तीन शिरे ।
खचित जयाला हे शोभति रे !
दंड - कमंडलु घे हाती रे ।
बालक बुडता त्या तारी । काय वर्णु मी0 ।।१।।
अनसुये पोटी देह धरुनी ।
समागमे गो-श्वान करुनी ।
काखे झोळी, टिळक वरुनी।
जटा मस्तकी, त्रिशुलधारी । काय वर्णु मी0।|२।।
पायि खडावा चटचट करिती ।
महंत-ऋषि ते तुजसी स्मरती ।
कृपा कटाक्षे भक्त उध्दरती ।
रुद्रमाला चक्रहि भारी । काय वर्णु मी0 ।।३|।
अवधुत-मूर्ती शोभे बरवी ।
नामस्मरणे पापी तरवी ।
तुकड्यादास बहुत गौरवी I
करी दासाला भव - पारी । काय वर्णु मी0 ।|४l।