देह- अहंता सोडुनिया, जा जा रे ! गुरु-पायी ।
(चालः कशा निभवशी काळ..)
देह- अहंता सोडुनिया, जा जा रे ! गुरु-पायी ।
न लगे गुज साधने, दयाळू ती सद्गुरु आई ॥धृ०।।
सांडुनिया निष्काम-सकामा, साधा गुरु-सेवा ।
तराल भव-सागरी हरुनिया, त्या षड् रिपु-भेवा ।।१॥
नलगे मंत्र न क्रिया, कर्म वासना विकारांची ।
धराल गुरुपद चुकेल पाळी, जन्म - मरणाची ॥२॥
त्याविण कोणी तारक सखया ! भव-सागरि नाही !
काय कोठवर सांगु सांगणे ? जा सद्गुरु- पायी ।।३॥
कळेल मग ते ज्ञान वैभवी, अपुले अपुल्याला ।
तुकड्यादास म्हणे गुरु-नामी, मागा सुख-प्याला ॥४॥