न मिळेचि सिध्द आम्हा, हा फोडिती हमामा
(चाल: सबके लिये खुला है...)
न मिळेचि सिध्द आम्हा, हा फोडिती हमामा ।।धृ0॥
अहोरात्र रुपि राहे, त्या सिध्द म्हणूनी पाहे ।
कधि द्वैत ते न साहे, संदेह ना रिकामा ll१॥
आत्मरूपाचे चिंतन, तोच मुख्य साधु जाण ।
जनि तो स्वये असून, विसरे न मेघश्यामा ।।२।l
राहि साधकाच परी, मुद्रा अलक्ष द्वारी ।
तोचि संत हो ! मुरारी, न चुकेचि सिध्द- नेमा ॥३।।
नर राहि सिध्द-संगे, न कळोनि रुपि रंगे ।
तुटती असत्य धागे, ये बहर अंगि रोमा ॥४॥
बाणे स्वरुप-स्थिती, त्यासीच सिध्द म्हणती ।
तुकड्यादास लोळे क्षिती, दे ठाव गुरु -रामा ! ।|५।l