मज दावा हो ! मज दावा हो

(चाल: घे करुणा गा घे करुणा..)
मज दावा हो ! मज दावा हो ! मज दावा राम विसावा हो !  llधृ०।।
नेत्रांजन घालुनि द्या कोणी, धुंडुनि आलो रानोरानी ।
तो वनमाळी न दिसे नयनी, भुललो निजगुण भावा हो ! ।।१।।
काय कुणा ऐसी भिक मागू ? दू:ख मनाचे कवणा सांगू ?
रामाविण मन झाले पंगू, त्या चरणी   मज   लावा  हो ! ।।२।।
सोशित दुःखा बहु श्रमलो मी, भवसागरि बुडता दमलो मी ।
विषयाचे भोगी भ्रमलो मी, न मिळे   कोठे   ठावा  हो ! ।।३।।
भक्तजनांचा तो कैवारी, संकट हे मम दूर निवारी ।
जो निज भक्तांचा हितकारी, तुकड्यादास सुखवा हो ! ।।४।।