मला आवडे नाम त्या श्रीहरीचे ।
(चालः चलाना हमें नाम गुरुका..)
मला आवडे नाम त्या श्रीहरीचे ।
न आणीक ते नाम गाईन वाचे ॥धृ0॥
हा सर्व संसार थाटूनि टाकी ।
नामामृते सदगुरू - रूप घोकी ॥१॥
नाही कुणी दूसरा, सर्व एक I
गुरु-शिष्य ते कोणते हो अनेक ? ॥२॥
धरी रे ! सदा भाव त्याचेच पायी ।
सोडूनिया धर्म चरणीच राही ॥३॥
सदा दास तुकड्या तो लीन चरणी ।
अंकीत राहीन हे सत्य वाणी ॥४॥