नमिला श्रीगुरु आडकुजी । भय नसे
(चालः तुम्हारे पूजनको भगवान..)
नमिला श्रीगुरु आडकुजी । भय नसे कळिकाळाचे जी !
तारक निज - सुखकारक तो, करिल भवसिधू - पार अजी ।।धo॥
सोडोनिया क्षीरसागर । धरिला वरखेडी अवतार I
शास्त्रासीहि न लागे थार । शेष स्तुति करिता शिणला जी ! ॥१ ॥
जेवि आंधळा जगी या फार । दिसे हो ! घोर तया अंधार I
त्यासी कुबडीचा आधार । सदगुरुचरणा तेवि पुजी ।।२॥
अता ही आसची उरली । मी बळकट कास ही धरिली ।
सदा लाविन धुळी भाली । प्रेम - पान्हा मला पाजी ॥३॥
तुकारामे धरिली कास । गेला देही वैकुंठास ।
करुनि चहुनारींचा नाश । परात्पर तोचि पाहिन जी ! ॥४॥
गोरोबाने सारली बाणी । नाम स्मरणी रतली वाणी ।
तेवि रंगोनि गुरु - चरणी । भजन प्रेमे करिन राजी ॥५॥
म्हणे तुकड्या स्वामी नाथा ! अंत का अजुनीही पाहता ?
दया तुज नये दीनानाथा ! त्यजिन मी प्राण चरणाब्जी ॥६॥