नाहि जरुर मज गड्या ! कुणाची, गुरु - चरण धरले I
(चालः कसा निभवसी काळ..)
नाहि जरुर मज गड्या ! कुणाची , गुरु - चरण धरले I
देहाचीहि न ठेवू पर्वा, चित्त नामि रमले ।।धृ०।।
मागुनि तुकडे घर - घर सारे खाऊ आनंदे ।
आत्मज्ञानी निशा घेउनी, नाचू स्वच्छंदे ॥
शंख - मृदंगहि मंजुळ वीणा, ऐकू अनुहाती I
अलक्ष मुद्रा चढवुनि केली, देहाची माती ।।
चंद्र सूर्य ते उजेड दाविती फिरता मार्गाने I
जिवनकला ती अमृत टाकी, पीतो प्रेमाने ।।
भोगुनि चार अवस्था आलो, उन्मन झरझरले ।
देहाचीहि न ठेवू ।।१।।
चैतन्याचा उजेड झकझक गगनी तो फुटला ।
रंगमेळ तो विचित्र दिसता पाहणारा भ्रमला ।।
पाहुनिया ते स्वरूप सुंदर अनंत रंगांचे ।
झाली विदेही स्थिति देहाची, सिद्धपणी नाचे ।।
दिसणे पाहणे सगळे बाबा ! अद्वैतचि बनले ।
देहाचीहि न ठेवू ।।२।।
झटकन उठूनी पटकन् लागे सहज समाधी हो !
आनंदे डुलतसे , खावया मिळती मोती हो ! !
मोति खातसे जो कोणी नर तोचि स्वर्गि राही ।
सांगतसे तुज गुप्त गोष्ट ही, कळत मला नाही ।।
तुकड्यादास आडकोजीला त्वरे शरण आला ।
नामामृत सेवुनी गडे हो ! चरणि लीन झाला ।।
मायिक जग हे नको अम्हाला, सेवू प्रेम - प्याले ।
देहाचीहि न ठेवू ॥३॥