पहा पहा विठोबा उभा विटेच्या कोरी ।
(चालः कशी फिरली हरिची..)
पहा पहा विठोबा उभा विटेच्या कोरी ।
दरबार उगवला तनघर - पंढरपुरी ।।धृ०।।
ती इडा -पिंगळा वाहि सुखे सामोरी ।
म्हणताति तिला जी भिमा-चंद्रभागारी ।।
तो हृदयनिवासी विवेक -भक्त पुढारी ।
ठेविले नाव त्या पुंडलीक अधिकारी ॥१।।
प्रवृत्ति-निवृत्ती उभ्या राहि दो भागी ।
त्या राही-रखुमाबाई नाद सुखसंगी ।।
उगवला आत्मचंद्रमा सहस्त्रदळ भाळी ।
रुपरंग निराळे विठो उभा वनमाळी ।।
दशनाद गजर-संचार महालाजवळी ।
तो शंख नगारा भेरि मृदंग या काळी ।।२।।
वाजती तुताऱ्या टाळ मंदिरे भेरी ।
ती अनाहती गर्जना करितसे फेरी ।।
वरि ओहं सोहं पंखा नित उपचारी ।
शोभला सावळा औटपिठामाझारी l
उरि सप्तचक्रहारांची गर्दी भारी ।
एकाहुनि एकावरी श्रेष्ठ झलकारी ।।
अनमोल रत्न हे मायेची कर्तारी ।
घातला हार विठू - गळी सुखे झणकारी l।३॥
शोभला रंग दरबार औट हातांचा l
साठविला विठ्ठल कैवारी भक्तांचा ॥
दरबार खुला चौफेर, नऊ दरवाजे ।
नऊदरवाजावर सुंदर खिडकी साजे ।।
मधि सेवा करिती गुरुराज महाराजे ।
अगणीत उभे जाहले, न उचले ओझे ।।
पहावया पातले विष्णु - पदीचे राजे ।
ते ग्वालबाल - गोपाळही संगे साजे ।।४।।
किति वर्णु वर्णवे ना मज तेथचि थोरी ।
दरबारि खेळ हा भरलासे घनघोरी ।।
वरि बडवे सद्गुरुराज पुजा-अधिकारी ।
दाविली दास तुकड्यास तेथची नगरी ।।
का स्वस्थ पाहता ! धरा सद्गुरु-तारी ।
दरबार उगवला, तनघर पंढरपुरी ।।५।।