पोटासाठी हिंडविसी का मज दारोदारी
(चाल: कसा निभवसी काळ..)
पोटासाठी हिंडविसी का मज दारोदारी ?
त्रासी बहु जाहलो त्रिविध या तापांनी भारी ॥धृ०।।
न धरी कोणी पोटी मजला श्री यादवराया !।
आस तुझ्या चरणांची म्हणुनी पडतो चरणी या ॥१।I
दीनानाथ तू दयाळू म्हणविसि आलो तुजपासी।
देई चरणी ठाव मला तू , का निष्ठुर होसी ? ॥२॥
कसे रक्षिले भक्त सर्वही ? मजसि नवल वाटे ।
ऐकुनि भक्त-जनांची कीर्ती हृदयि प्रेम दाटे ॥३॥
वस्त्र पुरवितो धावुनि कैसा त्या भक्तांसाठी ?
लागतसे तव चरणी देवा ! मज आवड मोठी ॥४॥
कधी न सोडी चरण तुझे मी, आण तुझी आई !
वाटे मजला प्राणचि द्यावा तव चरणाठायी ॥५॥
गुरु आडकुजी ! होई पावन त्वरित अगा ! मजसी ।
दास तुकड्या शरणचि आला, झाला परदेशी ॥६॥
करुणाकर श्री सदगुरुराया ! विठ्ठल ! नरहरी !
त्रासी बह जाहलो, त्रिविध या तापांनी भारी ॥७॥