नको धरु मनि राग दयाळा ! या बाळाचा अता ।
(चालः सद्गुरुराया ! का रुसला..)
नको धरु मनि राग दयाळा ! या बाळाचा अता ।
बहुत त्रासलो जन्म घेऊनी, झाली मजसी व्यथा ॥धृ०॥
दीनदयाळू तू खरा म्हणविसी, आलो तव पाया ।
राखि राखि रे ! ब्रीद अता ते श्री सदगुरुराया ! ॥१॥
जीर्ण शरीर हे, कपडे नसती अंगाचे ठायी ।
दुःखाने बहु व्याकुळ झालो, पाही लवलाही ॥२॥
तुकड्यादास शरण तुला रे, श्री सद्गुरुराया !
कृपा-कटाक्षे भक्त पाळ बा ! लागतसे पाया ।।३।।