आडकुजी गुरुवरा ! उपेक्षा का केलिस आजी ?
(चाल: कसा निभवसी काळ..)
आडकुजी गुरुवरा ! उपेक्षा का केलिस आजी ?
काय स्थिति या जगती होईल श्रीसदगुरु ! माझी ॥धृ०।।
नको सृष्टिचा ताप, क्रोध-मद-मत्सर बहु जाळी।
हरुनिया भवरोग मुलाचा, कोण दुजा पाळी ? ॥१॥
कासयास गा ! जन्म दिला मज अपकीर्तीसाठी ।
मायबाप जे तेहि न धरिती मजला गा ! पोटी ॥२॥
फिरता फिरता रानोरानी व्यर्थचि जगि बुडलो।
अजूनि का तुज दया येईना, आळविता शिणलो ॥३॥
काय करु मी ? चंचल मन हे एका स्थळि बा! राहीना ।
काय तरी प्रारब्धभोग मम ? त्वरीत मजला नेईना ॥४॥
तनू जीर्ण ही, वस्त्र फाटके घालतसे मी या देहा |
हे पाहनिया छळती मजला,म्हणती दुष्ट भिकारी हा ॥ ५॥
अन्न घरी खायास मिळेना, उपवासी ती माय मरी ।
बंडोजी भाट तो असे हो ! बहू कर्ज बाजारि तरी ।।६॥
तुकडया बहु शिणला जग-पाशे हे श्री आडकुजी !
देई चरणी ठाव मला गा ! आस नसेच दुजी ।।७।।