माझी चिंता हरि ! तुजला रे !
(चालः अपने आतमके चिंतन...)
माझी चिंता हरि ! तुजला रे ! तार कि मार अता राया !
भक्त रक्षिले संकष्टी बा ! म्हणुनी आलो तव पाया ॥धृ०।।
माया जाळे त्रासुनि मी या स्मरणी तुझिया स्थिर झालो ।
काम-क्रोध हे छळिती देवा ! बुध्दि नसे तव गुण गाया॥१॥
चांडाळचि मी खरा जन्मलो, पदरि न कोणी संत धरी ।
वाटे मजला पुनरपि देसी जन्म-मरण की रघुराया ! ।।२।।
ओरडता हा कंठ दाटला, वदणे नोहे मुखी माझ्या ।
ऐसे करि गा श्री आडकुजी ! ठेवी चरणी आपुलिया ॥३॥
तुकड्यादास हाचि वर मागे, लावी भजनी व्यवसाया ।
वरखेडी दे वास सदा गा ! श्रीगुरुदेवा ! तव ठाया ॥४॥