भक्तवत्सले माय भवानी ! तुळजापूर स्वामीनी !

( चाल : दयामयी अवतार . . ) 
भक्तवत्सले माय भवानी ! तुळजापूर स्वामीनी ! 
अंबिके ! प्रसन्न होई मनी ।।धृ०॥ 
दर्शन करण्या बहु दिवसांची , इच्छा होती मनी । 
पावलिस आज मनापासुनी ।
निसर्गसुंदर स्थान, रम्य हे तीर्थ तुझे पाहुनी l
शांतलो जगदंबे ! मी मनी ॥
महाराष्ट्राची स्फुर्ति-मूर्ति तू, कीर्ति ऐकली जनी ।
भेटलो आज मना अर्पूनी ।।
श्री छत्रपती शिवराय तुला   भेटला ।
लढण्यास शक्तियुक्तिचा हात तू दिला ।
उचलुनी दिली तलवार, स्फुर्ति अणि कला ।
तसेच यश दे आज महाराष्ट्रास धाव घेउनी ।
नव्याने तेजवि ही   मेदिनी  l।१॥
योग्य काळ हा नाहि म्हणुनी का स्वस्थ अशी बैसली ?
बोलली नाही कुणाशी खुली ।।
कोण तुझ्यावाचूनी अंबिके ! जगताची माऊली ?
स्फुर्ति देशील मुलांना भली ।।
आळसला महाराष्ट्र जिवाला कळकळ ही भेदली ।
संस्कृती लया जाउ लागली ।।
उघड गे नेत्र, कर दया बालकांवरी ।
हे स्वराज्य टिकण्या स्फुर्ति देई अंतरी ।
प्रगटवी आपुली सत्ता लोकांतरी ।
तुकड्यादास हाची वर मागे, तव पदि शिर ठेवूनी ।
दयाळे ! सुखवी भारत  गुणी ॥२॥