कुणीतरी सांगना , कुणीतरी सांगना
( चाल : दुनिया न भावे मोहे . . )
कुणीतरी सांगना , कुणीतरी सांगना ,
हरिदर्शनासी काय पाहिजे ? कुणी सांगना ।।धृ०॥
घरदार सोनिया रानोरानी हिंडती ।
गळा माळ, भाळी टिळा, आसनेही मांडती ।।
करिताती जपतप, तरी शांति येईना ।
हरिदर्शनासी काय पाहिजे ? कुणी सांगना ।।१l।
ग्रंथ वाचणारे म्हणती - वेदश्रुती वाचली ।
तीर्थाटने केली सारी, योगमुद्रा साधली ।।
जी हानी ना ये काही, किती करा याचना ।।
हरिदर्शनासी काय पाहिजे ? कुणी सांगना ।। २॥
दान धर्म व्रते केली, तीही न येती कामा ।
संतसंगतीचा महिमा सर्व सांगती आम्हा ।।
संतसंग केला तरिही दोष कांही जाईना ।
हरिदर्शनासी काय पाहिजे ? कुणी सांगना ।।३।।
सर्व काही केले तरिही, एकचित नाही झाले !
भांबावले लक्ष सारे, तुकड्यासी हेचि स्फुरले ।।
निश्चयाचे बळ नाही तरी हरि येईना ।
हरिदर्शनासी काय पाहिजे ? कुणी सांगना ।।४।।