कठिण कठिण हा भवपुर सखया ! हो जागृत उघडी डोळा
(चालः अपने आतम के चिंतन में..)
कठिण कठिण हा भवपुर सखया ! हो जागृत उघडी डोळा ॥धृ०।।
कोणि न पार ययाचे गेला, जाइल गुरुघरचा विरळा ।
धन -दारा- सुत पाहुनि भुलला, शेवट जाइल मद विरला ।।१।।
पंच विषयरत मद मत्सर हे, होतिल साथी त्या काळा ।
यमराजा मग मारिल डाका, जवळ असे ऐसी वेळा ।।२॥
कोणि न देई साथ स्मशानी, जाशिल रे ! भज घननीळा ।
स्त्रीपुत्रादिक स्वार्थी सगळे, धन खातिल तोडनि बाळा ! ॥३॥
जोड करुनि घे आत्मसुखाची, निर्भय होशिल मग काळा ।
तुकड्यादास म्हणे गुज समजी, घे प्रगटुनि हृदयी ज्वाळा ॥४॥