काय वर्णु गुण तव ते ? श्री कृपाकरा !
(चाल: भाललोचना रे गड्या भेटि..)
काय वर्णु गुण तव ते ? श्री कृपाकरा !
ब्रम्हादिक शरण, होत घाबरा ।।धृ०।।
अजब दाविली कि लीला रचुनिया किती ।
धर्म - नीति - न्याय तुझा, देत आसरा ।।१।।
स्तंभाविण नभ-तारे, अधर रविशशी ।
पृथ्वि भोवती जल ते, उचलिली धरा ।।२।l
वाहतो कि वायु किती पाहिजे तसा ।
जलबूंदहि झुळझुळती, मिळति सागरा ।।३।।
शोभिवंत हे पहाड , वन कसे फुले ?
पाहुनिया सुख होई, मजसि ईश्वरा ! I|४।।
भरूनिया चराचरी, उरे कसा कुठे ?
दास तो तुकड्या म्हणे,दे भेटि प्रभु ! जरा ।।५।।