खचित माझा भरोसा रे !

(चालः अरे हकदार प्यारे दिल...)
खचित माझा भरोसा रे ! नसे दुसरा कुणीहि मला ।
जगाचा तू जगत्राता, असुनि मी शरण कोणाला ? I।धृ०।।
बहुत मी पातकी हरि रे ! माफ करि दोषगुण सारे ।
शरण आल्यास दूर कसा करिसि गा तू सख्या ! असला ? ।।१।।
नाम तव क्षिरसागरवासी, अशी का दृष्टि फिरवीसी ?
तारिले भक्त अगणित ते, अता निष्टठूर का   बनला ? ।।२।।
म्हणे तुकड्या कृपा-सिंधू ! करी रे ! मज खरा बोधू ।
सत्य स्वरुपास त्या शोधू, अजामिळ तो कसा गेला ? ॥३॥