नच कोणी मज आश्रय दुसरा तुजविण रामा रे !
(चाल: कसा निरभविसी काळ...)
नच कोणी मज आश्रय दुसरा तुजविण रामा रे !
बहु त्रासलो या भवडोही, येई तू कामा रे ! ॥धृ॥
पाच विषय हे झोंबुनि मजला त्रास बहू देती I
कामक्रोध, मदमोह, फजीती, यांचे सांगाती ।।१॥
मना वाटते ऐसे आता की त्यजु मी प्राण I
वय हे सर्वहि जाईल मग बा ! कोण करिल मान ? ॥२॥
फरफर ओढुनि काढितील मज काळ येउनीया ।
तुकड्या अंकित बुडतो, राखी तव चरणी राया ! ॥३॥