नावरते देवराया ! तुमची अजिंक्य माया
(चालः भारत में फिरके आजा...)
नावरते देवराया ! तुमची अजिंक्य माया ।
करु कैसे या उपाया ? जाईल देह वाया ।।धृ०॥
कळते परी न वळते, मन अंतरी उसळते ।
धरु कैसे बा ! मना या ? तुमची अजिंक्य माया ।।१।।
क्षणि एक बोध येई, क्षणि विषयि धाव घेई ।
हरु कैसे बा ! भ्रमा या ? तुमची अजिंक्य माया ।।२।l
सत् - संगतीत जावे, वैराग्य अंगि घ्यावे ।
स्मरु कैसे या टिकाया ? तुमची अजिंक्य माया ।।३।।
हरिनाम गात जाता, विरहे निरवांत चित्ता ।
भरु कैसे बा ! जिवा या ? तुमची अजिंक्य माया ।|४।।
विषयार्थ धाव घेई, क्षण रामि मग्न नाही ।
हरु कैसे बा ! विषा या ? तुमची अजिंक्य माया ॥५।।
तुकड्यास भीक द्यावी, ही भाक पायि घ्यावी ।
मरु कैसे नाम गाया ? तुमची अजिंक्य माया ।।६।।