भारत मातेचा म्हणण्यासी, लाज अम्हाला का आली
(चाल : हरिका नाम सुमर नर..)
भारत मातेचा म्हणण्यासी, लाज अम्हाला का आली ।
आजवरी ही शरम धरोनी, व्यथा पहा कैसी झाली ।।धृ०॥
देश कुणाचा अध्यक्षाचा ! अथवा पंतप्रधानाचा ।
अम्ही सर्वही सहकारी जर, मग तर आम्हा सर्वांचा ।।१॥
जबाबदारी ज्यांना कळते, स्वस्थ्य कसे ते बसणार ?
कोटि कोटि जनतेची कळकळ, शिरि असता का हसणार ?।।२।।
कोण्याहि परक्याने यावे, कब्जा करण्यासाठि इथे ।
आम्ही तयाला हासत वदतो, बसा बसा मग बघु की ते ॥३॥
वाहवारे ही राजनीति अन् धर्मनीति ही बघा जरा ।
चरित्र सगळे गोल जाहले, आटूनि गेला देश - झरा ॥४॥
काय होईल ही धरणे सडका, धुरे-बंधारे बांधोनी ?
माणसातली माणुसकी जंव, गेली लयाला जीवप्राणे ॥५॥
जो तो म्हणतो मी माझे, मज पर्वा दुसऱ्याची न दिसे ।
स्वार्थासाठी आशा धरुनी-फिरता दिसता वेडे - पिसे ॥६॥
जातीजातीचे थवे थांबती, शिकार करण्या प्रांताची ।
प्रजातंत्र हे राज्य म्हणाया, लाज वाटते सध्याची ॥७॥
म्हणुनी म्हणतो भारतमाता, विसरु जाता काय कसे ?
दिसाल अपुल्या घरट्यामाजी, पशुपक्षी राहतात जसे ॥८॥
जग जाते चंद्रावर बसण्या, अम्ही न अपुले घर सोडू ।
कसा काळ आला हा बाबा ! काय म्हणावे रडू रडू ।।९॥
तुकडदास म्हणे जागे व्हा, परधर्माच्या मुठीतुनी ।
काळसर्प प्रेमाने बसला, गुलाम न करो पुन्हा झणीं ॥१०।।
- गुरुकुंज-आश्रम, दि. २२-०५-१९६२