पुन्हा तरि बांधु नका मंदिर
( चाल : तुम्हारे पूजनको भगवान . . )
पुन्हा तरि बांधु नका मंदिर
असतिल त्यांची करावी फिकीर ।।ध्रु।।
मंदिर जीर्ण असे ज्या स्थानी ।
ते सुधरावे दान करोनी ।
भाविक लोकां द्यावा धीर । असतिल ॥१॥
तेथे भजन करा संतांचे ।
प्रवचन व्हावे विद्वानांचे ।
तोडुनि भेदभाव - जंजीर । असतिल ॥२॥
सेवाभाव वाढवा लोकी ।
सगळ्यांची असावी एकी ।
अभिमानाचे तोडूनि शीर । असतिल ॥३॥
नास्तिक श्रध्दाहिन ते दूर ।
ऐकू नये तयांचा सूर ।
पतनी जाईल तेणे शरीर । असतिल० ॥४॥
पडले - झडले दुर्बल जीव ।
त्यांची सदा करावी कीव ।
तुकड्या म्हणे मार्ग खंबीर । असतिल० ॥५॥