कुष्ठरोग हा असाध्य नसतो , यत्न तयाला हवा
( चाल : घाबरला का तरूण गड्या रे . . )
कुष्ठरोग हा असाध्य नसतो , यत्न तयाला हवा
तयाला हवा , तयाला हवा ।
संसर्गहि बहु त्याज्यचि नसतो , जसा क्षयाला हवा
क्षयाला हवा , क्षयाला हवा ॥धृ०॥
कोणी म्हणतो पूर्वजन्मिचे पाप म्हणोनि होई तो ।
हे म्हणणे तर व्यर्थ दिसे मज , कुणास का वानवा ?
का वानवा ? का बानवा ? ॥१॥
ईश्वर कोपे म्हणूनि रोग हा येतो ऐसे जन म्हणती ।
मज वाटे हे कारण खोटे अशुध्द खाण्याशिवा ।
खाण्याशिवा , खाण्याशिवा ॥२॥
रक्ताचा जरि संग घडे तो तरिच तयाचे ये जंतू ।
विरूध्द खाणेपिणे अजीर्णे , तरिच वाढतो नवा ।
वाढतो नवा , वाढतो नवा ॥३॥
इंद्रिय ज्याने स्वैर सोडली , संयम ज्याचा नाहि जरा ।
त्यासचि ग्रासे महारोग हा , समजूनि द्या मानवा ।
द्या मानवा , द्या मानवा ॥४॥
योग्य औषधे मिळती याची , लपवु नका या रोगासी ।
तुकड्यादास म्हणे सुंदर व्हा , पुन्हा जीवन साजवा ।
जिवन साजवा , जीवन साजवा ॥५॥