बलहीनाला कोण साथ दे ? जोवरि शक्ती नाहि उरी
(चाल : फटक्याची..)
बलहीनाला कोण साथ दे ? जोवरि शक्ती नाहि उरी ।
अम्ही जरि चुकलो,कार्या मुकलो,देवदेवता काय करी ?।।धृ०l।
कोणी म्हणती हिमालयाला, सह्याद्रीला नमन करू ।
असतिल बसले आसनस्थ जे,ध्यान लावूनी तया स्मरू ।।
मी म्हणतो तुमच्यात हिमालय, गिरी सह्याद्री हृदयस्थ ।
उठा उभे व्हा, हाक तया द्या,का बसले अजुनी स्वस्थ ? ।
ज्या देशातिल तरूण आळसी, सर्व तयाचे होति अरी ।
अम्हि जरि चुकलो ॥१॥
तोंड फाडुनी मिळे अन्न का ? शेती जोवर ना पिकली ।
पिकेल कैसी ? नांगर, धरण्या, ज्याची बाही सदा ढिली ।।
कसेल त्याची जमीन म्हणुनि गाण्याने का धान्य मिळे ?
कसणारे लागतात बाबा ! तरीच हे बोलणे फळे ॥
अजुनि तरी ही जाग नसे कां ? हा शत्रू घुसलाच घरी ।
अम्हि जरि चुकलो 0।।२॥
भारतियांनो ! नका विचारू, चुका किती आणि का केल्या ?
व्हा भरती फौजेत जाउनी, राखा स्वातंत्र्या अपुल्या ॥
दृष्टि फिरे जरि नवतरुणांची, लक्ष हिमालय होति उभे ।
कोण पुढे ये पाहु तयाला, ओढुनि काढू प्राण-जिभे ।।
किडे-मकोडे खाउनि कोणी, चढतचि नव्हते शिरावरी ।
अम्हि जरि चुकलो0।।३।।
आग लागली कैलासाला, जरी शिव-गिरी ओघळला ।
भारतियांच्या शूरत्वाने शांत करु सगळ्या धवला ।।
घराधरातुनि वीर निघु द्या, धनराशी यंत्रांसाठी ।
शेतक-यांनो ! अन्न वाढवा, शेति करा सुंदर ऐशी ।।
तुकड्यादास म्हणे यश तुमचे, तुम्ही यशाचे मानकरी ।
अम्हि जरि चुकलो0॥४॥