मधुवनि मधुकर हा रंगला ।
( राग : मालकंस , ताल : त्रिताल )
मधुवनि मधुकर हा रंगला ।
रंग लागला अतिच तयाला ||धृ०॥
सुंदर नयन मृगांच्या झंडी ।
गर्द वेलिच्या तळिची थंडी ।
कोकिळ मयुर - ध्वनित गुंगला ! ॥१॥
मंद - मंद दिनकर दे किरणे ।
अति प्रसन्न वाहति ही झरणे ।
मधुर सुगंधित गंध पसरला ॥२॥
रांगोळीसम पुष्प - सडा हा ।
रंग अनंत गमे उघडा हा ।
किलबिल चिवुचा , जीव दंगला ! ॥३॥
राधा संगती , मधुरा भक्ती ।
गोपाळांची प्रेमळ पंक्ती ।
तुकड्या पाहण्यासी भुकेला ! ॥४॥