बघू दे , बघू दे मज आत्म्याने बघू दे ।

( चाल : बजा दे , बजा दे , तेरी बंसी . . . ) 
बघू दे , बघू दे मज आत्म्याने बघू दे । 
जगू दे , जगू दे , मन हे तिकडे जगू दे ॥धृ०॥ 
कोणी बघती विषय नेत्री , स्वार्थ - ज्योती लावुनी ।
हे सारे क्षुद्र हेतू ,  हृदयातुनि    निघू    दे ॥१॥ 
क्षणभरी हा आरसा लावोनी पाहणे कासया । 
सतत आनंदात जीवन , मन हे   फुगू   दे ॥२॥ 
सृष्टि ही निरपेक्षतेने , पाहता मज प्रेम ये । 
तेचि निर्मळ पाहणे , शेवटचे    शिकू   दे ॥३॥
याचि नेत्री , याचि हृदये , ब्रम्ह सारे भासते । 
दास तुकड्या सांगतो , मन माझे बसू दे ।।४।।