बहुत सुख घेसी । परि अंति कुणाला नेशी ?
(चालः असा धरि छंद..)
बहुत सुख घेसी । परि अंति कुणाला नेशी ? ।।धृo।।
बाप बंधु रे ! आणिक माय I
बोल साथि हे येतिल काय ?
ना सोय अजुनिही धरसी ।
बा ! व्यर्थ प्रपंची मरसी ॥१॥
पैसा जोडुनि कवडी-कवडी ।
अंती लंगोटी ती सोडी ।।
कष्टातच वय हे नेसी ।
का गुरु - शरण ना जासी ? ।।२।।
गमाविले बालकपण खेळी ।
जमवुनि मित्रगड्यांची टोळी ॥
व्यर्थ का फजित रे ! होसी ?
धरि अजुनी लीनपणासी ॥३॥
सेवुनि सदा प्रपंची विषय ।
कीर्ती न मिळे,न मिळे अभय ।।
का अजुनी वाया भ्रमसी ?
तुकड्या म्हणे जा गुरुपासी ॥४॥