मनुजा ! का रे ! भुलला मायी ?
(चालः मोसम कौन कुटिल खल..)
मनुजा ! का रे ! भुलला मायी ?
जगि तुजविण कुणि नाही ।।धृ०।।
तूच जगी बा ! ब्रह्म असे ते, त्वंपद-तत्पद पाही ।
घटचि निरंजनमाळ सोडुनी, का रे ! फिरसि प्रवाही ? ॥१॥
या मायेच्या लागुनि कासे, चौऱ्यांशि गोते खाई ।
सुंदर काया होई जीर्णचि, सर्व व्यर्थ मग जाई ॥२॥
लाविल काळ गळ्यासी फासी, सोडविण्या कुणि नाही ।
तुकड्या म्हणे गुरुचरणा सेवी, कृपेने भवपार होई ।।३॥