का परक्याला बोल लाविसी ? म्हणसी देवे केले हे
(चाल: उठा गड्या ! अरुणोदय..)
का परक्याला बोल लाविसी ? म्हणसी देवे केले हे ।
सर्वचि देवे केले ऐसा भाव तुझा का रे ! नोहे ? ।।धृ०।।
अवचित सापडली तुज योनी, बहुत प्रयासे करुनिया ।
काय कमाई केलि मानवा ! जासि यमाद्वारी वाया ।।१।l
नसे भरवसा अंतकानळिचा, साधन करि मम आण तुला ।
तोबा तोबा करता करता, अंती गवरी पडसि भला ।।२।।
नराचाहि नारायण होतो, ऐसा सद्गुरु-महिमा रे !
तुकड्यादास शरण त्या गेला, चरणी रतला प्रेमा रे ! ।।३॥