भाग्य हे उघडले , बघोनी चरणा

( चालः जागरे ! झडकरी कुणी ये . . . ) 
भाग्य हे उघडले , बघोनी चरणा ! ! 
विसरुनी गेली , जन्मीची ही भावना ! ॥धृ०।। 
आणिकांचा संग खोटा , या मनी स्फुरला ! 
म्हणुनी विसरले , विषय समुळ हे - 
आत्मरुपाची,   उगवली    ही  प्रेरणा  ! ।।१।।
संगतीने ज्ञान झाले , कोण मी कुठला ! 
जिवा - शिवाचा , भेद विसरला 
दुःखची गेले ,   ही    निमाली   यातना ! ॥२॥ 
पावते जल हे जलासी , मी - तू हा भाव विरला ! 
तुकड्यादासा , अघटित घडले - 
विश्वची माझे ! - दृढ झाली ही कल्पना ! ॥३॥ 
                        - गुरुकुंज आश्रम , दि . ०४ - ११ - १९५९